शिवमय मी (भाग - १) - कथा


गंधमादन पर्वताच्या पायथ्याशी नदीकाठी पाषाण न्याहाळत मी उभा होतो. लतावेलींच्या रंगानी, पक्षांच्या

किलबिलाटांनी गंधमादन पर्वताची भुमी कशी बहरून निघाली होती. नदितल मधुर पाणी पिऊन मन कस तृप्त झाल होत. पर्वताच्या माथ्यावरून आढेवेढे घेत येणारी नदी जणू त्याचे चरणच धुत असावी असा क्षणभर भास मला झाला.
तप:श्चर्येसाठी लागणारा काळा गुळगुळीत पाषाण शेवटी माझ्या दृष्टीस पडला. अंगातल जाणंव मागे सरकवल आणि हातातला कमंडलु खाली ठेऊन, नदिच्या पात्रात मी पाय ठेवला. अर्ध पुरूषाच्या आकाराऐवढा पाषाण मी एका खांद्यावर उचलुन धरला आणि नदिच्या पात्राकडुन बाहेचा मार्ग हेरला. 


निबिड अरण्यातून वाट काढत पाच विशाल स्तंभरूपी कदंब वृक्षांनी वेढलेल्या मोकळ्या जागेच्या मध्यभागी आलो. खांद्यावरचा विशाल पाषाण मी खाली ठेवला. कमंडलुत पाणी, पुजेसाठी काही फुले आणि बिल्वपत्रे घेऊन आलो. कोणत्याही देवताची तपस्या सुरू करण्यापुर्वी त्या देवतेची अनुज्ञा  घ्यावी लागते आणि ती भेटल्यावरच तपस्या आरंभ करता येते, हे तातांचे शब्द आठवले. भगवान शंकर हे एकांतप्रिय होते, योगीराज होते. ते सतत योगसाधनेत रमलेले असत आणि अत्यंत खडतर तपस्या करणाऱ्यालाच प्रसन्न होत. याची कल्पना तातांनी मला आधिच देऊन ठेवली  होती. पाषाणा समोर पद्मासनात बसलो आणि शिवस्तवन सुरू केला.

शिवकांत शंभो शशांकार्धमौलै
महेशान शूलिन जटाजूटधारिन्
त्वमेको जगद्व्यापको विश्वरूपः
प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप॥

हळुहळु निर्सगात बदल व्हायला लागला, भर उन्हात मेघ दाटुन आले, अंधार दाटु लागला, सोसाट्याचा वारा वाहु लागला. कदंब वृक्षांच्या फांद्या हेलकावे खाऊ लागल्या. आकाशातुन विजेचा एक प्रचंड झोत समोरच्या पाषाणात घुसला. पाषाणाला शिवलिंगाच स्वरूप प्राप्त झाल. हळूहळू त्यावर तेज चढायला लागल. सुवर्णी रंगाच्या  तेजाच्या दोन वलयी एकामागुन एक शिवाच्या आवडत्या डमरुच्या आकारात एकमेकाच्या विरद्ध दिशेने शिवलिंगाला प्रदक्षिणा घालु लागल्या. भगवान शंकराची अनुमती भेटली आणि हीच संधी साधुन मी शिवलिंगाची पुजा केली.

गुरूकुलात असतांना तातांनी तपस्येसाठी लागणाऱ्या ध्यानाविषयी सखोल ज्ञान आम्हाला प्रदान केल होत. त्याविषयीच्या सगळ्या गोष्टी डोक्यात गर्दी करू लागल्या. प्रत्येकाला पाच इंद्रिय असतात. कर्ण, चक्षू, रसना, त्वचा आणि नासिका. यांना भौतिक इंद्रिय म्हणतात, कारण ती दिसतात. हि इंद्रिये प्रत्येकाचे गुण ठरवतात. मुख्यत: याचे तीन प्रकार पडतात. रज, तम आणि सत्व. आपण जगण्यासाठी या इंद्रियांवर अवलंबून असतो, म्हणजेच एका दृष्टीने आपण त्यांचे दास असतो. या सगळ्या इंद्रियांचे दमन करणे ही तपस्येची पहीली पायरी होय. आणि तपस्येची सुरवात म्हणजे ध्यान. भौतिक इंद्रियांवर ताबा मिळवणे सोपे असते. पण ह्या सगळ्या इंद्रियांच्या शक्तीचा एक भाग अजुन एका शक्तीजवळ असतो.आणि याच शक्तीला चित्त किवा उभयात्मक मन अस म्हणतात. हे मन शरीरात कुठेच नसत, पण हे नसुनही असत. पण ते कस अस्तित्वात येत यालाही एक मोठ कारण आहे.

आपल्या शरीराचा प्रत्यक्ष संबध वैश्वीक ऊर्जेशी असतो. आत्मा हा त्या ऊर्जेचा एक विखुरलेला भाग असतो. प्रत्येक आत्म्याला एकच उद्देष्य असतो, आणि तो म्हणजे, त्याच्या मुळ स्थानी म्हणजेच वैश्वीक ऊर्जेपाशी पोहोचन.आणि जर आत्म्याला त्याच्या मुळ स्थानी पोहोचायच असेल, तर त्याला विश्वकर्ता ब्रम्हाने बनवलेल्या सृष्टींच्या नियमाप्रमाणेच जाव लागत. म्हणजेच, जन्म घेऊनच त्याला आपल्या मुळ स्त्रोत्रापर्यंत पोहोचता येत. मग आत्मा हा त्याच्या कर्मानुसार शरीराशी जोडला जातो. आत्म्याच्या वरती बुद्धी, आणि बुद्धीच्या पलीकडे इंद्रिय असतात. जेव्हा तो जीव, बुद्धी आणि इंद्रियाचा अर्थ समजु लागतो तेव्हा बुद्धीच्या शक्तींचा मेळ इंद्रियांच्या शक्तींशी होतो. आणि यातूनच चित्त किवा मनाचा जन्म होतो. जस, जेव्हा पर्वतावरच्या टोकावरून वाहणार नदिच पाणी कीतीतरी योजने खाली कोसळत आणि वाहात पुढे जात. पण जेव्हा ते पाणी खाली कोसळत तेव्हा त्या जागेवर आर्द्रता निर्माण होते आणि त्यातुन थंडावा निर्माण होतो. थंडावा तिथेच असतो, पण तो कधी दिसत नाही. येथे बुद्धी हे पर्वताच्या वरच्या टोकाच प्रतिक आहे. इंद्रिय हे पर्वताच्या खालच्या भागाच प्रतिक आहे. मन किवा चित्त हे थंडाव्याच प्रतिक आहे आणि वाहणार पाणी हे बुद्धी आणि इंद्रियांच्या शक्तीच प्रतिक आहे.

हे मन खुपच चंचल आणि बलिष्ठ असत. जस हवेला मुठीत बांधन अवघड आहे, तसच या मनाचा निग्रह करणं अतिशय कठीण. हेच मन, बुद्धी आणि इंद्रियाच्या शक्तीचा वापर करून पुष्कळ गोष्टींची निर्मीती करत. यामधे अहंकार, क्रोध, वासना, भीती, मोह हे प्रामुख्याने असतात. जसजस मनाची शक्ती दिवसेंदिवस वाढू लागते, तसेच हे मन हळुहळु एक भ्रामक जगाची कल्पना आपल्यासमोर बनवू लागत. ही भ्रामक जगाची कल्पना म्हणजेच आपल्या बुद्धीचे विचार आणि इंद्रियांच्या कृतींचे फळ होय. म्हणूनच म्हणतात, जसे जगाकडे पाहाल तसेच जग दिसेल. हळुहळु जीव या भ्रामक जगात इतका गुंतुन जातो, की त्याला आपल्या अस्तित्वाचा विसर पडतो. आणि आपल्या अस्तित्वाला जाणने हाच तपस्येचा मुळ उद्देष्य होय.

यासाठी सर्वप्रथम एकांतात शुचिरभूत व्हावे, शांत राहावे, नेत्र मिटावे. सगळे लक्ष कर्णावर केंद्रित करावे. आपल्या चहूबाजूंचे सगळे आवाज ऐकावे व ते कशाचे आहे हे जाणुन घ्यावे. सर्व आवाज एकत्र ऐकण्याची घाई करू नये किवा एकाच आवाजात अडकून राहू नये, प्रत्येक आवाजाला एका मागुन एक अशी संधी द्यावी. मग स्वतःला प्रश्न विचारावा "खरच मी हा आवाज आहे का?" जर गहन विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही हा आवाज ऐकणारे नसुन त्याला जाणणारे आहात.

आता तुमचे सगळे लक्ष तुमच्या भोवतीच्या वातावरणावर केंद्रित करा आणि तुम्ही काय अनुभवता आहात हे जाणून घ्या. जसे तुमच्या सभोवतालचा वाहणारा वारा थंड आहे की उष्ण, त्यात कोरडेपणा आहे की आर्द्रता, शरीर हलक वाटतय की जड, वाऱ्याचा वेग कसा आहे. आता स्वतःला तोच प्रश्न विचारा "मी म्हणजे वातावरण आहे का?" तेव्हा उत्तर येईल "नाही. मी म्हणजे वातावरण नसुन त्याचा अनुभव करणारा आहे"

असच मग तुमच ध्यान शरीरावर, शरीरांच्या भागावर, श्वासावर, रसनेवर आणि चित्तावर केद्रित करून हे जाणा की तुम्ही हे इंद्रिय नसुन त्यांना जाणणारे किवा त्यांना अनुभवणारे आहात. मग तुमचा शेवटचा प्रश्न हाच असेल "जर मी हा चेहरा नाही, आवाज नाही, शरीर नाही, शरीरीतील कोणताच भाग नाही, श्वास नाही, मन नाही, विचारही नाही, तर मग मी नेमका आहे तरी कोण?" आणि त्याच उत्तर असेल "मी, या सगळ्या गोष्टींची अनुभुती घेणारा आहे, आणि स्वतःच अस्तित्व जाणण्यासाठी या शरीराशी जोडला गेलोय". रोज ध्यानाचा नियमीत सराव केल्याने एकाग्रता वाढते आणि चित्त स्थिर होते. आणि मग या सरावाने शरीराला समाधीची अवस्था प्राप्त होऊ लागते. समाधी म्हणजे शरीराची अशी अवस्था ज्यामधे साधक इंद्रिय, मन आणि बुद्धीचा त्याग करतो आणि सरळ आत्म्याजवळ पोहोचतो, वैश्वीक ऊर्जेशी एकरूप होतो. एकदा शरीराला समाधीची अवस्था प्राप्त झाली, मग तापसांना आणि देवगणांना साधकाची जाणीव व्हायला लागते.

मी तपस्येला प्रारंभ केला. एका पायावर उभा राहुन , दुसरा पाय पहिल्या पायाच्या टोंगळ्याच्या मागे ठेवला. दोन्ही हात जोडून डोक्याच्या वरती नेले. श्वास-उच्छवास प्राणायमात निबध्द केला. चंचल चित्त स्थिरतेत बांधुन एकाग्रतेची लय साधु लागलो. मुखातुन मंत्राचा उच्चार निघु लागला.

ओम नम: शिवाय...

आधी रसनेने, मग मनाने आणि नंतर केवळ संवेदनेने मंत्राचा उच्चार सुरू ठेवला. शरीर निश्चल झाल. भोवतालचे सगळे आवाज कानांनी झिडकारले, फुलांचा गंध नाकात शिरूनही त्याची जाणीव नाहीशी झाली. शरीराच्या सगळ्या संवेदना नष्ट झाल्या. शरीराला समाधीच रूप प्राप्त होऊ लागल. 

काही मास लोटल्यानंतर तपसाधनेच्या सामर्थामुळ, तेजपुंज शक्तीच एक गोलाकार वलय माझ्याभोवती निर्माण व्हायला लागल. आजुबाजुच्या कदंब वृक्षाची मुळ मातीतून वर येऊन माझ्या पायांना चिकटले, जणूकाही मी त्यांचाच भाग झालो होतो. शेकडो वर्षाची तपस्या म्हटल्यावर, या शरीराला पाहिजे ती शक्ती आता मला निसर्गच पुरवणार होता. पण या सगळ्या गोष्टीपांसुन मी अनभिग्य होतो.

तपसामर्थ्यान बनलेल शक्तीच गोलाकार वलय आता पूर्ण झाल होत. आपल्या आत्म्यातून निघालेल्या विशिष्ट प्रकारच्या लहरी, आपल्या आराध्यापर्यंत पोहोचवायच काम हे शक्ती वलय करत होत. जीवजंतू शक्यतो या वलयापासुन दुरच राहत होते, कारण या वलयात येणाऱ्या प्रत्येक जीवाची संपुर्ण शक्ती शोषुन त्या शक्तीच रूपांतर ते साधकाच्या शक्तित करत होत. त्यामुळे कित्येक वाळलेल्या पानांचा सडा माझ्याभोवती पडला होता.

या वलयात आपली शक्ति न गमवता कस यायच आणि बाहेर कस पडायच, याच ज्ञान क्वचितच लोकांना असायच. जसे देवी-देवता, रूषी-मुनी आणि अप्सरा. देवाचा राजा इंद्र हा नेहमीच एखाद्या साधकाची तपस्या भंग करायचा. पण यालाही एक विशिष्ट कारण होत. ते अस की प्रत्येक साधक सहसा तपस्या इंद्रपदासाठीच करायचा. दुसर कारण म्हणजे, की एका ठराविक वेळेवर प्रत्येक इंद्र बदलला जायचा आणि त्या सिंहासनावर नविन इंद्र आरूढ व्हायचा. आपल्या कार्यकाळात कोणतेही विघ्न येऊ नये व तो जास्तीत जास्त वेळेपर्यंत टिकुन राहावा यासाठी देवांचा राजा इंद्र हा उपक्रम चालवायचा. सहसा देव त्यांच्या विज्ञानाच्या बळावर निसर्गात बदल करून साधकाची तपस्या भंग करायचे. पण जेव्हा साधकाची तपस्या त्याच्या उच्च स्तरावर असायची त्यावेळी देवता फक्त अप्सरेलाच निवडत. 
कारण कोणतीही तपस्या भंग करायची असेल तर प्रथम भौतीक इंद्रियांवर प्रहार व्हायचा. जस कर्णासाठी मधुर संगीत, त्वचेसाठी मऊ ऊबदार स्पर्श, नासिकासाठी सुगंध. आणि हे सगळे गुण फक्त अप्सरेतच सापडत. अप्सरा या देवतांची करमणूत तर करायच्या पण त्यांना निवडण्यात देवतांचा दुहेरी उद्देष्य असायचा. पहिला हा की  एखाद्या रूषीमुनी ची तपस्या भंग करतांना जर तो मरण पावला, तर ब्रम्हहत्येच पाप लागायच. दुसरा म्हणजे, जर तपस्या भंग करतांना रूषी भानावर आला, की त्याचा क्रोध शापाच्या रूपाने बाहेर यायचा आणि तो अप्सरेला मिळायचा आणि देवता त्यापासुन मुक्त राहायचे. त्यामुळेच कपटी देवता एका साधकाची तपस्या भंग करण्यासाठी एखाद्या अप्सरेलाच पाठवायचे.

अप्सरा सुंदरतेत, गायनात एकापेक्षा एक वरचढ असायच्या. त्यांचा मृदु आवाज, कोमल स्पर्श, लखलखती सुवर्णी काया आणि नेत्रांनाही भुरळ पडावी अशी शरीराची सडपातळ बांधणी. देवतांच्या साम्राज्यात अप्सरेच्या प्रशिक्षणांसाठी विविध कार्यशाळा उपलब्ध होत्या. ह्या कार्यशाळा कामदेव आणि देवी रति यांच्या देखरेखीखाली होत्या. या कार्यशाळेत नृत्य, कला, गायन, वादन, श्रुंगार इत्यादी विषयात त्यांना पारंगत केल जायच. देवतांची आयुष्य मर्यादा ही हजारो काळ असल्यामुळे देवतांना त्यांच्या अभ्यासात अधिक वेळ घालवता येई. त्यामुळेच देवतागण किवा अप्सरा त्यांच्या कामात निष्णात असायच्या.

तपस्या भंग करण्यासाठी अप्सरा प्रथम साधकाच्या भोवतीच वातावरण संगीत, सुगंधाने प्रसन्नचीत्त करून टाकायची. कर्णांना सुखावनारा मंद मंद संगीताचा आवाज आणि गायनाचा अल्हादायक सुर. नाचतांना हलकेच झालेला अप्सरेचा मऊ उबदार स्पर्श आणि गळ्यात परीधान केलेल्या कृत्रीम फुलमाळेचा गंध इंद्रियांना वेड लाऊन सोडत. एकदा साधकाने नेत्र ऊघडले, तर इंद्रिय सुखाने आसक्त होऊन, तो समोर नाचणार्या अप्सरेच्या प्रेमातच पडुन जायचा आणि स्वतःला पुर्णपणे विसरून जायचा. जोपर्यंत साधकाच गोलाकार वलय पुर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत अप्सरा त्याच्या सहवासात राहयची. एकदा हे वलय नष्ट झाल तेव्हा अप्सरा निघुन जायच्या आणि साधकाची तपस्या अश्याप्रकारे भंग व्हायची.

पण माझी तपस्या भंग करण्यासाठी इंद्राजवळ ते कारण होत का? हो, कारण तर होतच. आणि माझा तपस्येचा उद्देष्य तर तोच होता. विश्वविजयासाठी मला शक्तीशाली बनंन भागच होत. पण मला त्याची चिंता अजिबात नव्हती. उग्र तपस्या करण्याचा माझा निर्णय प्रबळ होता. तपस्येमधे स्व:ताला पुर्णपणे विसराव लागत आणि आपल्या आराध्याशी एकरूप व्हाव लागत, जे मी तपस्या सुरू होताच साध्य केल होत. एक प्रश्न तुम्हाला आता नक्कीच पडला असेल, की मी आहे तरी कोण?

सांगतो....
विश्व जिंकण्याच्या हेतूने पछाडलेला मी, अमरत्वाची आस धरलेला मी.
मी… तिन्ही लोकाचा शासक, मी… शिवाच्या भक्तांमधे प्रथम मान मिळवणारा सेवक.
मी…  ब्रम्हाचा पणतु,
मी…  सुमालीचा नातु,
मी…  महान पिता विश्रवा आणि माता कैकसीचा पुत्र.
मी…  अर्ध ब्राम्हण, अर्ध राक्षस
मी......…… रावण.
क्रमश:

उपसंहार

"शिवमय मी" ही पौराणिक कथा आहे. ही कथा मला का व कशी सुचली या प्रश्नाचे उत्तर अजुनही मला सापडले नाही. या कथेचा पहीला भाग लिहीतांना मला पुष्कळ गोष्टींचा अभ्यास करावा लागला. जसे रावण कोण होता, तो कसा घडला, ध्यान म्हणजे काय, त्याचे प्रकार... इत्यादी. ध्यानाचा अभ्यास करतांना पुष्कळ गोष्टी उलघडत गेल्या. तरीही त्याची तयारी अजुनही अपुर्णच आहे अस मला वाटते. ही कथा पौराणिक असल्यामुळे यात ध्यान, आध्यात्माचा उल्लेख जास्त प्रमाणात आहे. त्या काळातल विज्ञान, आजच्या पिढीतल्या लोकांना कदाचीत पटण्यासारख नाही. कारण आजच्या जगात प्रत्येक आश्चर्याच्या मागे जर एखादा सिधांत नसेल, तर त्या आश्चर्याला वाचकाच्या विश्वासाचा किवा सहमतीचा शिक्कामोर्तब मिळत नाही. त्यामुळेच आजच्या वेळेतल्या कथा कादंबरींमधे त्यावेळेच्या विज्ञानाची कल्पना सहसा काही सिधांत देऊन सादर केली जाते. योगसाधनेची शक्ती, त्यावेळेसचे अस्त्र, शस्त्र, मंत्रारूढ करून चालवलेले बाण, जे कधी अग्निचा तर कधी पाण्याचा मारा करायचे, मायेचा प्रयोग करून सुरू केलेले युद्ध या सगळ्या गोष्टी आजच्या काळात फक्त एक भाकड कथा बनून राहील्या आहे. जिथे विज्ञान संपत तिथुन आध्यात्माची सुरवात होते, आणि आध्यात्म हे विज्ञानाच्या पलिकडे घेऊन जात, ज्यालाच "प्रग्यान" म्हणतात, हीच त्याकाळची संकल्पना. तरीही त्या काळच्या विज्ञानाला योग्य न्याय द्यायचा प्रयत्न मी पुढल्या भागात नक्कीच करेल. कथेची प्रस्तावना लिहीतांना नकळत मला प्रस्तावना का लिहायची याचे महत्वसुध्दा कळले, आणि तोच प्रयत्न मी कथेच्या शेवटच्या शब्दापर्यंत ठेवला.

या भागात पुष्कळ कल्पनांना जन्म द्यायचा प्रयत्न मी केला आहे. जस तपस्या सुरू करण्यासाठी लागणारी अनुमती, मन कस तयार होत ही कल्पना, आत्म्याचा वैश्वीक ऊर्जेशी असलेला संबध, साधकाच्या भोवती निर्माण होणार शक्तीच वलय, झाडाची मुळ साधकाला स्वतःशी जोडुन निसर्गाशी एकरूप होण, शक्तीवलयामुळे इंद्र तपस्या का भंग करतो याची कारणं, अप्सरांच्या निर्मीतीच कारण आणि त्या तपस्या कश्या भंग करतात याच वर्णन. यामधे अप्सरांनी गळ्यात परीधान केलेली कृत्रीम फुलमाळ ही त्या काळच्या विज्ञानाचा संबध दर्शविते.

मनाची निर्मीती आणि ध्यानाचे महत्व याबद्दल पुष्कळ गोष्टी आणि कल्पना टाकता आल्या असत्या. पण कथेचा मुळ उद्देष्य बाजुला न राहावा यासाठी मी त्या आवर्जुन टाळल्या. आता या साधकाच्या तपस्येत किती अडथळे येतात, त्याची तपस्या किती उग्र बनते आणि त्याला शिव प्रसन्न होतो की नाही, हे पुढल्या भागातच कळेल. जन्म दिलेल्या कल्पनांना न्याय देण्यात मी किती यशस्वी ठरलो हे वाचकच ठरवतील. आणि त्यांचा प्रतीसाद लक्षात घेऊन "शिवमय मी - भाग २" लवकरच प्रस्तुत करीन. कृपया तुमचा अमुल्य प्रतिसाद अवश्य कळवा आणि तुम्हीपण शिवमय व्हा.

ओम नम: शिवाय...

संदर्भ : दशानन (जयंत जोगळेकर), परशुधारी परशुराम (सुधाकर शुक्ल), ध्यानियमन 

Comments

  1. Om namah shivay...
    Adorable..

    ReplyDelete
  2. मस्त.. खुप अभ्यासपूर्वक लीहल.. प्रतिसाद लक्षात घेऊन नको लिहु, तू फक्त लिह.. तुझ्या भाषेत सांगायच तर,

    कर्म करत रहा.. फळ मिळेल.. 😊

    ReplyDelete
  3. खूप छान भावा.. लिहित रहा

    ReplyDelete
  4. भावा भारी लिहलय. माहित नव्हतं तुला लिहायची पण सवय आहे. आज फेसबुकवर तुजी पोस्ट दिसली म्हंटल बघुया तरी काय लिहिलंय ते.

    Keep it up 👍👍👌

    -Sagar Patil

    ReplyDelete
  5. आत्ताच लिहीन सुरू केलय. शिवमय मी चे तीनही भाग publish केले आहे, आवडले तर नक्की सांग. :)

    ReplyDelete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  7. Nice one Ashya... Well written and well structured by deep study... Now, I came to know since when you started reading it and it seems from your writting that you must have tried this way of meditation... And yes you have tried it.

    ReplyDelete
  8. Thanks Amit. Hope you like complete story also. :)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog