कृष्ण आणि मी (भाग २ - दान)

शिवालयातुन नुकतीच पुजा उरकऊन मी पिंपळाच्या झाडाखालच्या चौथाऱ्यावर बसलो होतो. मंदीरात



संध्याकाळच्या वेळी नेहमी येणारी परिचयाची लोक आजसुद्धा ये-जा करत होती. समोरच कृष्ण आपल्या पिशवीतुन गोर-गरीबांना खायच्या वस्तु वाटत होता. त्याच्या साध्या व्यक्तीच्या गणवेशातसुद्धा त्याच कृष्णपण लपल नव्हत. तो माझ्या आयुष्यात आल्यापासुन माझ्यात अमुलाग्र बदल घडुन आला होता, आणि तो मलासुद्धा दिवसेंदिवस जाणवत होता.

सगळ दान वाटुन तो माझ्याजवळ येऊन बसला. मंदिरातच पहुडलेली सगळी कुत्री त्याच्या मागोमाग शेपुट हलवत जवळ आली. त्यांच्या शेपुट हलण्याच्या वेगातुन ती कृष्णासाठी किती अधिर झाली आहे हे कळत होत. कांहीनी तर त्याच्या मांडीवर आपल तोंडच ठेवल. कदाचीत त्यांनी त्या साध्या गणवेशामागचा कृष्ण ओळखला असावा. कृष्णाने हळुवार आपला हात त्याच्या डोक्यावरुन फिरवला. मग मीसुद्धा त्याच अनुकरण केल. तेव्हाकुठे ती सगळी कुत्री शांतपणे आमच्यासमोर गराडा करुन बसली. मंदिरातला ये-जा करणारा प्रत्येक व्यक्ती एक विचित्र पण हसरा कटाक्ष आमच्याकडे टाकुन जात होता.

मनात पुष्कळवेळ चाललेला एक प्रश्न मला वेडावुन सोडत होता. मला माहित होत की कृष्णाला मनातल्या सगळ्याच गोष्टी कळताय, पण तो फक्त मंद मंद हसत होता. शेवटी मी न राहावुन त्याला विचारलच.
"कृष्णा! तुला अस वाटत नाही का, रस्त्यावरच्या भिकाऱ्याला काही देण्यापेक्षा एखाद्या हॉटेलात काम करणाऱ्या नौकराला काही देण जास्त चांगल राहील? कारण तो काहीतरी कमवुन मिळवतोय."

माझा तो विचार ऐकुन तो खुपच मोकळा हसला. तरीही मी उत्तराची वाट बघतच होतो.
"चुकतोस वेड्या तु. रस्त्यावरच्या भिकाऱ्याला जे दिलं त्याला दान म्हणतात आणि तु जे म्हणतोय त्याला मदत" कृष्ण म्हणाला.

"मग दान म्हणजे काय?" मी विचारल.

"पुढच्या व्यक्ती जवळ काहीही नाही हे माहीत असतांना निरपेक्ष भावनेनं दिली गेलेली मोलाची वस्तु म्हणजे दान. आणि पुढच्या व्यक्ती जवळ काहीतरी विपुल प्रमाणात आहे हे माहीत असुन त्यांना निरपेक्ष भावनेने दिलेला सहभाग म्हणजे मदत. पण यात महत्वाची गोष्ट म्हणजे देणाऱ्याने देतांना मनात कुठलीही अभिलाशा ठेऊ नये. नाहीतर त्या दानाला काहीच महत्व उरत नाही" कृष्ण म्हणाला.

"कृष्णा, दान खरच एवढ महत्वाच का रे?" मी विचारल.

हसतच तो म्हणाला "हो वेड्या, दानाच खुप महत्व आहे."
मी कानात प्राण एकवटुन त्याचा शब्द न शब्द वेचत होतो. माझे डोळे त्याच्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हावभाव टिपत होते. पिंपळाखाली बसलेल्या त्या कृष्णाचे काळेभोर नेत्र आकाशाच्या अनंतात स्थिरावले आणि तो पुढे बोलु लागला.
"वृध्द, अपंग आणि निराधार आई यांना तर आवर्जुन दान द्यावच. कधी कधी तर अवघ जग दात्याच्या दानावर अवलंबुन असत. साक्षात ईश्वरसुद्धा दानासाठी त्याच्या लाडक्या भक्ताकडे हात पसरवतो. या जगात कित्येक दानवीर होऊन गेलेत ज्यांनी आपल्या शेवटच्या क्षणातसुद्धा निस्वार्थपणे दान केल"

"तु अंगराजाबद्दल बोलतोय ना कृष्णा?" मी विचारल

"हो वेड्या. श्रेष्ठ दानवीरांनमधे गणला जाणारा अंगराज कर्ण त्यातलाच एक" कृष्ण म्हणाला.

"तु म्हणालास की कधी कधी अवघ जग कोणाच्या दानावर अवलंबुन असत, ते मला कळल नाही" मी विचारल.

"हो! जसा राजा बली. वामन अवतारात ब्राम्हण वामनाने तीन पाय धरती राजा बलीला मागितली होती. जर ते दान त्या राजाने नसत दिल तर तो श्रेष्ठ दानविरांमधे गणला गेला नसता. द्रव्यदान, अन्नदान, ज्ञानदान, न्यायदान, धर्मदान असे कित्येक दानाचे प्रकार आहेत वेड्या"

"कृष्णा, श्रेष्ठ दान कोणत रे?" मी विचारल.

काहीतरी विलक्षण तेजानं त्याची मुद्रा तळपुन उठली आणि तो पुढे म्हणाला
"प्रत्येक दान दुसऱ्या दानापेक्षा वरचढ आहेच. पण जे दान सगळ्याच दानापेक्षा वरचढ आहे ते म्हणजे क्षमादान. क्षमादान या जगातल सर्वश्रेष्ठ दान आहे. ज्याच्याजवळ क्षमेच दान आहे तो या जगातला सगळ्यात शक्तीशाली मनुष्य. क्षमेमुळे दात्याच्या मनात समाधान, करुणा, प्रेम आणि काहीतरी चांगल केल्याचा आनंद निर्माण होतो. आणि क्षमेच दान प्राप्त करणाऱ्याच्या मनात ती क्षमा देणाऱ्या दात्याबद्दल आदर, प्रेम आणि विश्वास निर्माण होतो. म्हणुनच अस म्हणतात दानाचा खरा लाभ देणाऱ्यालाच होतो, घेणाऱ्याला नाही"

"पण कृष्णा, तु तर तुझ्या जिवनात कित्येकांना दंड दिला, त्यांना शासन केल. त्यांना क्षमा करता आली नसती का?" मी विचारल

"चुकतोस वेड्या तु. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, ज्याप्रमाणे एखाद्या द्रव्याच दान फक्त दानपात्रातच टाकल जात, त्याचप्रमाणे क्षमेच दान हे 'चुकीच्या' पात्रातच टाकल जात. कारण 'चुक' ही क्षम्य असते. आणि मी ज्यांना शासन केल, असे माझे कंस मामा, कालयवन, जरासंध, शिशुपाल ईत्यादी यांनी जिवनात चुका नसुन तर अपराध केले होते, आणि अपराध हे कधीही क्षम्य नसतात. क्षमेच दान कधीही अपराधाच्या फाटक्या झोळीत जात नाही. आणि जरी ते दिल तरी त्या क्षमादानाला काहीही अर्थ उरत नाही. कोणत्याही अपराधाला शिक्षा हेच क्षमादान आहे". कृष्ण म्हणाला.

"पण मग चुक आणि अपराध यांच्यात फरक काय?" मी विचारल

"नकळत किंवा अज्ञानामुळे जी गोष्ट घडते ती चुक, आणि माहित असतांना सुद्धा ज्या गोष्टी घडवुन आणल्या जातात तो अपराध. म्हणुनच 'चुका या घडतात' आणि 'अपराध हा केला जातो'." कृष्ण म्हणाला.

"पण मग अपराध घडतात तरी कसे?" मी विचारल

"नकळत पहिल्यांदा एखादी चुक होण हे स्वाभाविक असत. पण तीच चुक पुन्हा न घडावी याची दक्षता आपण घ्यायला हवी. चुक पुन्हा पुन्हा करतांना व्यक्ती त्याच्या परिणामाकडे दुर्लक्ष करु लागते आणि तीच चुक मग त्याची सवय बनते. एकदा जर चुक ही सवय बनली, तर मग त्याने कितीही प्रयत्न केले तरी ती चुक त्याला अपराधी बनवल्याशिवाय सोडत नाही. आणि हळुहळु त्या सवयीच्या माध्यमातुन व्यक्ती अपराधाकडे वाटचाल करते" कृष्ण म्हणाला.

मी त्याच सगळ बोलण लक्षपुर्वक ऐकतच होतो. काहीतरी आठवत तो पुढे म्हणाला
"शिशुपालासोबत सुद्धा हेच झाल. दुसऱ्यांचा अनादर करण्याची त्याला सवयच लागली होती. मी जेव्हा त्याच्या आईला वचन दिल, की मी त्याच्या १०१ अपराधांकडे दुर्लक्ष करीन, तेव्हा तो त्याच्या अपराधांची नोंद ठेऊ लागला. पण शेवटी तो ती गणती विसरलाच, आणि शिक्षेस पात्र ठरला. अश्याच प्रकारे त्याची चुक त्याला अपराधी बनवुन गेली."

सुर्य पुर्णपणे मावळला होता. जवळ जवळ सर्वत्रच अंधार पडला होता. रस्त्यावरचे दिवे केव्हाच लागले होते. त्याने बोलतच राहाव आणि मी ऐकतच राहाव अस वाटत होत. तो आणि मी उठुन उभे झालो, तोच सगळी कुत्री एका आर्त आवाजात आम्हाला हाक मारु लागली. जेणेकरुन ती आम्हाला सांगत होती की परत जाऊ नका. कृष्णाने त्यातल्या एकाच्या डोक्यावरुन हात फिरवत संगळ्यांना मुकपणे आश्वासन दिल 'उद्या आम्ही परत येऊच', तेव्हा कुठे ती शांत झाली आणि आम्ही घराकडल्या परतीच्या मार्गावरुन निघालो.


१-जुन-२०१६
एक कृष्णवेडा

Comments

Post a Comment

Popular posts from this blog