अमृतकुंड - War Redefine भाग - २ तीन भक्त

अमृतकुंड War Redefine
भाग २ - तीन भक्त

विभीषन
युद्ध सुरु व्हायच्या पुष्कळ वर्षापुर्वी...
"ओम ब्रम्हणेय नम:"...
ओम ब्रम्हणेय नम:..
शांती....अगणित शांती....
सुख, दुख, आशा, निराशा, मान, सन्मान, क्लेश, भिती, अहंकार... सगळ काही सोडुन आम्ही तिघे बंधु या 



पर्वताच्या चौथाऱ्यावर न जाणो कित्येक वर्षे तप:श्चर्या करत होतो. आमच अस्तित्व वेळेच्या पलिकडे गेल होत. काळ आणि गतीचे नियम आमच्या शरीराला लागु होत नव्हते. मनात फक्त एकाच गोष्टीचा ध्यास घेऊन आम्ही परमपिता ब्रम्हाला प्रसन्न करायला निघालो होतो. तपश्चर्या सुरु होऊन किती काळ लोटला याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. मंत्राचा स्वर्गीय सुर ध्यानी मनी पसरला होता. नेत्र कित्येक तप बंद होते, तरीही अल्हाहदायक प्रकाशाची अनुभूती त्यांना होत होती.

अचानक नेत्रांना अल्हाहदायक वाटणारा प्रकाश त्रीव्र होऊ लागला. मी एकीकडुन दुसरीकडे विलक्षण गतीने जात असल्याचा भास मला होऊ लागला. आजुबाजुच्या संपुर्ण वातावरणाला भेदुन जाणारा एकच आवाज गुंजारला. आवाजावरुन स्पष्ट लक्षात येत होत, तो आवाज खुप वयोवृध्द वक्तीचा असावा. आवाज कठोर होता, पण वाणी सौम्य आणि मृदु होती.

"डोळे उघड पुत्रा. महान रुषी पिता विश्रवा आणि माता कैकसीच्या पुत्रा, डोळे उघड!"

मी नेत्र हळुवार उघडले. मी कुठे होतो याची कल्पना मला आली. माझी तपस्या पुर्ण झाली होती. माझ्यासमोर दुसर कुणी नसुन स्वतः होते ते, विश्वनिर्माता, स्वयंभु, परमपिता, भगवान ब्रम्हदेव. मी ब्रम्ह-आयामात होतो (another dimension of Lord Bramha). ब्रम्ह-आयाम! या भौतीक जगाचा केंद्रबिंदु. ईथे अंधार असुनही प्रकाश होता, शांतता असुनही आवाज होता. खरच काय होत तिथे? कदाचीत मी प्रज्ञानाच्या (प्रज्ञान - विज्ञान्याच्या पलिकडे असलेल) सहवासात होतो.

परमपिता ब्रम्हाच्या तेजाचा प्रकाश अवतीभवती विखुरला होता. चेहऱ्यावर दिव्य अशी आभा पसरली होती. भरदार पांढऱ्या मिशा आणि दाढी छातीवर रुळली होती. दोन्ही बाजुला असलेल्या मुखाची पांढरीशुभ्र दाढी दोन्ही बाजुच्या खांद्यावर पसरली होती. एका हातात कमळ, दुसऱ्या हातात वेदांचं चर्मपत्र, तिसऱ्या हातात कमंडलु आणि चौथ्या हातात रुद्राक्षाची माळ होती. त्यांची शरीरयष्ठी एका वृद्ध ब्रम्हणासारखीच सडपातळ होती. काहीही असल तरी ते या विश्वातले पहीले ब्राम्हण होते. दोन्ही हातात आणि पायात भरदार कडे घातलेले होते. शरीराला झाकण्यासाठी पांढरशुभ्र नेसलेल धोतर टोंगळ्याच्या वरपर्यंत घट्ट बांधल होत. हातांच्या मनगटांवर आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा लोंबकळत होत्या. डावा पाय उजव्या पायाच्या टोंगळ्यावर स्थिरावला होता, आणि  त्या पायतली पादुका ब्रम्ह-आयामात अलगत तरंगत होती. त्या परमपित्यासमोर मी असा भासत होतो, जसा हत्तीसमोर मुंगी.

परमपिता जेव्हा बोलले तेव्हा त्यांचा एकच आवाज चार वेगवेगळ्या मुखातुन येत असल्याचा भास होत होता. ते पुढे बोलु लागले.
"पुत्रा! मी तुझ्या तपस्येवर प्रसन्न आहे. तु कशासाठी ही तपस्या आरंभली ते सांग. मी तुझी ती ईच्छा पुर्ण करेन"
ते चतुर्भुज रुप पाहुन नेत्र डबडबुन आले. ज्या ईच्छेसाठी मी जिवनभर यत्न केले, भक्ती केली ती आता पुर्ण होणार होती. जसा एक तहानलेला जीव पाण्यासाठी आतुरलेला असतो, तसेच माझे कर्ण शब्दांरुपी पाण्यासाठी तहानलेले होते. मी पुढे बोलु लागलो.
"हे चतुर्भुज, हे स्वयंभु, हे पदम्जा, हे नाभीजा....
एकाच गोष्टीची आस धरुन मी या तपस्येची सुरवात केली होती. अवघं जिवन मी या क्षणाची प्रतिक्षा केली परमपिता!"
"माग विभीषणा! निसंकोच माग. तुझी कुठलीही ईच्छा मी पुर्ण करीन"
"हे प्रभु! या विश्वातला प्रत्येक जीव अजाणता ज्याच्यासाठी धडपडत असतो, आणि तेच या जगातल अंतिम सत्य आहे, तेच धर्म आहे, सनातन आहे. ती एकच गोष्ट मला हवी आहे!
मला हवा आहे......'मोक्ष'"
"हो प्रभु, मला मोक्ष हवा आहे. मला मोक्ष द्या".

पांढऱ्या प्रकाशीत नेत्रांनी परमपिता माझ्याकडे बघत होते. ते पुढे बोलु लागले.
"विभीषणा! तु योग्य तेच बोलला. मोक्ष हेच या जिवानच अंतिम सत्य आहे. तोच धर्माचा अंतिम केंद्रबिंदु आहे. पण जिवन जगतांना कोणत्याही मर्त्य जिवाला मोक्ष संभव नाही. मोक्षासाठी आपले विहीत कर्म पुर्ण करुनच तो साधता येतो. त्यामुळे मी तुला मोक्ष देऊ शकत नाही. पण तुझ्या तपस्येमुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे, त्यामुळे मी तुला मोक्षप्राप्तीचे संपुर्ण ज्ञान देतो."

परमपित्याचे नेत्र क्षणभरच चकाकले. कृत्ज्ञन्यतेने मी हात जोडुन नेत्र मिटले, आणि ते ज्ञान ग्रहण करु लागलो. माझ्या डोक्यात वेगळीच चमक उठली, सर्वत्र अल्हाहदायक प्रकाश दिसत होता. असंख्य घंट्यांचा आवाज कर्णामधे घुमू लागला. एका अभुतपुर्व आंनदाची अनूभुती होऊ लागली. अनंत शुभ्र प्रकाशात मी हात जोडलेल्या एका काळ्या ठिपक्यासारखा दिसत होतो. असंख्य प्रकाशकिरण धनुष्यातुन सुटलेल्या बाणाच्या वेगाने माझ्या समोरुण मागे जात होते, मला ज्ञानप्रकाश देत होते.

अचानकच, एक अंधूक अंधूक हलणारी आकृती मला दिसु लागली. कदचीत ती वायुवेगाने पळत असावी. तेवढ्यातच एक आवाज कानी पडला.
"विभीषणा....."
त्या आवाजावरुन स्पष्ट लक्षात येत होत, ती एक भीतीयुक्त गर्जना होती. तो आवाज खुपच ओळखीचा वाटत होता. बुद्धीचे सगळे कोपरे मी तपासले, पण मला ते आठवेना.

हळुहळु ती दिसणारी आकृती नितळ पाण्यासारखी स्वच्छ होऊ लागली. मला ते दिसु लागल. ते एक युद्धात लागणार कवच होत. मी युद्ध विषयात कधीही जास्त रस दाखवला नव्हता, पण मला युद्धाविषयीच सगळ ज्ञान मला होत. कंबरेला बांधलेल ते कवच वायुगतीने हलत होत, कदाचीत ते कवच परिधान केलेली व्यक्ती वेगाने पळत असावी. त्या कवचाचा आकार रक्ष जातीतलाच होता. दोन निलमय हातांनी धनुष्यावर आकर्ण एक बाण ओढला जात होता. एक केसाळ भारी भरकम पाय जमीनीवर नुकताच उतरला. तो अक्राळ विक्राळ पाय एका राक्षस असावा की एका प्राण्याचा हे मात्र लक्षात येत नव्हत. पायात चांदीचा तेवढाच भारी भरकम कडं घातल होत. हादरलेली जमीन आणि उडलेल्या धुळीवरुन लक्षात येत होत, उंच उडी घेऊन तो नुकताच जमीनीवर उतरला असावा. आकर्ण ओढलेला बाण सूsss आवाज करत कवच तोडत शरीरात घुसला असावा. 'टणण्' असा आवाज झाला. रक्ताच्या थारोळ्या उडल्या आणि त्याचसोबत निळा प्रकाशी द्रव सोबत उडला. आईच्या गर्भातल हालचाल करणार एक बाळ नजरेसमोर तरळु लागल. एकच विज कडाडली आणि एक किंचाळी कानी पडली. तो अत्यंत पिडादायी आवाज होता. एकच प्रकाशझोत चमकला आणि विध्वंस झाला आणि माझे नेत्र उघडले.

माझे नेत्र परमपित्यावर स्थिरावले. प्रश्नार्थक मुद्रेने मी त्यांच्याकडे बघत होतो. मी काही बोलणार त्याआधिच परमपिता पुढे बोलु लागले.

"विभीषणा! अगाध भक्ती आणि सत्यप्राप्तीची ईच्छा यामुळेच तुला मोक्ष प्राप्त होईल. नियतीने तुला एका महान कार्यासाठी निवडलेल आहे. एक अस महान कार्य, जे स्वतः भगवान विष्णुसुद्धा तुझ्या मदतीशिवाय ते योजिलेल कार्य पुर्ण करु शकणार नाही. तुझ्या जिवनात असा एक क्षण येईल, जेव्हा तुझा तो एक निर्णय तुला मोक्षप्राप्तीकडे घेऊन जाईल. त्याच कार्याची दुरदृष्टी मी तुला दाखवली. भगवान विष्णुवर तुझी असीम भक्ती अशीच राहु दे. तुझ कल्याण होवो"

मी काही बोलायच्या आतच परमपिता अंर्तधान पावले. मी ब्रम्ह-आयामातुन केव्हा बाहेर पडलो माझ मलाच कळल नाही.

***

युद्ध सुरु व्हायच्या आधी...

रामेश्वरमच्या किनारी बनविलेल्या पर्णकुटीत श्रीराम आणि इतर मंत्रिगण चर्चा करीत बसले होते.
"प्रभु, युद्धाची सगळीच तयारी पुर्ण झाली आहे. सगळे वानरसैनिक या युद्धासाठी तयार आहेत आणि आपल्या पुढच्या आदेशाची वाट बघत आहे"

"सुग्रीवा, कुठल्याही मंगल कार्याची सुरवात जशी भगवान गणेशाच्या आशिर्वादाने पुर्ण होत नाही, तसेच कुणतेही युद्ध भगवान महादेवाच्या आशिर्वादाशिवाय सुरु करता येत नाही. आपल्याला 'शिवलिंगाच्या' पुजेची सिध्धता करण आवश्यक आहे. या पुजेसाठी एक सगळ्यात निपुण ब्राम्हण शोधुन आण, या पुजेत कसलीही कमतरता असता कामा नये" श्रीराम म्हणाले.

महादेव हे श्रीरामाच्या सगळ्यात जवळचे आणि पुज्यनिय होते हे मी जाणुन होते.
"प्रभु, पण आता ईथे यावेळेला एक निपुण ब्राम्हण मिळण कठिण आहे. जर आपण ब्राम्हण शोधायला निघलो तर आपल्याला बराच काळ येथे काढावा लागेल" सुग्रीव म्हणाला.

"शिवलिंगाची पुजा तर ईथेच होणार, अन्य कुठेही नाही. तुझ काय मत आहे विभीषणा?" काहीसा विचार करुन श्रीराम म्हणाले.
भगवान शंकराच नाव ऐकताच माझ्या मनात सगळ्यात पहिला विचार तो दादाचाच यायचा. विचाराच्या गर्दीतुन बाहेर येत मी बोलु लागलो.

"प्रभु, रावण हा भगवान महादेवाचा निसिम्म भक्त आहे, आणि जन्माने ब्राम्हणसुद्धा. त्याचासारखा निपुण ब्राम्हण शोधुनसुद्धा सापडणार नाही. तुमची अनुमती जर असेल तर, दादाला आमत्रंतीत करु का?"
"अरे मग विचारतोस काय विभीषणा. रावणाला आमंत्रीत करा आणि पुजेच्या सिध्धतेला लागा" श्रीराम म्हणाले
पाठवलेल्या आमंत्रणाचा निरोप निसंशय येणारच होता. भगवान शंकराच्या पुजेच अतिथ्य दादा कदीही सोडत नसे. शंकराची पुजा ही त्याच्यासाठी शंकराची आज्ञाच असायची. पुजेचा दिवस उजाडला, दादा ब्रम्हवेशात रामेश्वरमला काही ब्राम्हणांसह पधारला. दादा पुजेच्या साहीत्याची भराभर आज्ञा सोडत होता, आणि श्रीराम त्या आज्ञा पुर्ण होत आहेत की नाही याची दखल घेत होते. अचानकच दादाने कुटीतुन सुग्रीववाला आदेश सोडला.

"तुझ्या राजाला बोलव"
सुग्रीव लगेच श्रीरामाला बोलावुन घेऊन आला.

त्या दोघांना समोरा समोर बघुन कुणीही म्हटल नसत, हे दोन शत्रु आहे.
"राजा!" दादा अोरडला. त्याचे दोन्ही तेजस्वी ब्राम्हनेत्र अाग ओकत होते.
"निरादर....घोर निरादर! एका ब्राम्हणाला पुजेसाठी आमंत्रीत करुन त्याला प्रतिक्षा करायला लावतोस तु राजा"
"क्षमा असावी ब्रम्हवर्य! आपण कसली प्रतिक्षा करता आहात, आपण पुजेला प्रारंभ करु शकतो. सगळी तयारी पुर्ण झाली आहे" श्रीराम शांतपणे हात जोडुन म्हणाले.

"नाही राजा! तयारी पुर्ण नाही. शिवलिंगाच्या पुजेसाठी राजासोबत त्याची अर्धांगीनी असण अपेक्षीत आहे. तिच्याशिवाय ही पुजा मी प्रारंभ करु शकत नाही. जा तुझ्या अर्धांगीनीलासुद्धा घेऊन ये!"
"मला क्षमा असावी मुनीवर! पण ती पुजेसाठी उपस्थित राहु शकणार नाही"

"राजा! याचा अर्थ काय? ब्राम्हणाला यज्ञासाठी आमंत्रीत करुन त्याला थांबवुन ठेवण हा फक्त यज्ञाचाच  नाही तर तो त्या ब्राम्हणाचासुद्धा अपमान आहे" दादा कडाडलला.
"क्षमा असावी मुनीवर! पण माझी पत्नी सध्या लंकेमधे कैदेत आहे, त्यामुळे ती इथे उपस्थित राहु शकणार नाही" श्रीराम म्हणाले.
काही क्षण शांतता पसरली. दादा फारच क्रोधात होता आणि आम्ही सगळे चितींत होतो. तेवढ्यात श्रीराम म्हणाले

"मुनीवर! जर आपण यज्ञाला सितेशिवाय तिची सोन्याची बाहुली बनवुन ती बसवली तर?"
"विकल्प! मला विकल्प सुचवतोस राजा. मी कुठल्याही विकल्पावर विश्वास ठेवत नाही. माझ्या शंकराची पुजा आरंभुन मला तु निमंत्रण दिलेस हे विसरु नकोस. ही पुजा संपवल्याशिवाय मी इथुन जाणार नाही हे तु  जाणतोस" दादा पुन्हा कडाडला.

"पुन्हा क्षमा असावी मुनीवर, मग आपणच काय तो मार्ग सुचवावा"
"ठिक आहे राजा. ही पुजा पुर्ण व्हावी यासाठी मी तुझ्या पत्नीला इथे पाठवायचे आदेश लंकेत देतो. पण पुजा समाप्त झाल्यावर तुला तिला तसेच लंकेत परत पाठवावे लागेल"
"आपण निश्चिंत आसाव मुनीवर, ती इथे आल्यावर मी एक शब्ददेखील तिच्याशी बोलणार नाही. ती आली तशीच सुखरुप लंकेत परत जाईल"

दादाने लंकेत आदेश धाडले आणि सिता माता पुजेसाठी पोहोचल्या. पुजेला प्रारंभ झाला. बेल,फुल शिवलिंगावर उधळले गेले. गुंगी आणणारा मंत्रोच्चार सुरु झाला. महादेवाची आराधना दोन मोठ्या भक्तांनी केली. हो! दादा आणि श्रीराम, महादेवाचे दोन विरुध्द स्वभावाचे भक्त आपल्या प्रिय महादेवाची भक्तीभावाने पुजा करु लागले. भोवतालचे सगळे जमलेले वानरसैनिक दोन दिग्गज शत्रुंना समोरा समोर पाहात होते. सिता माता असुनही नसल्यासारख्याच होत्या. पुजा संपली. श्रीराम आणि माता सिता दोघांनीही शिवलींगाला हात जोडले. ब्राम्हणाचा आशिर्वाद घेण्यासाठी माता सितेने दादाला चरणस्पर्श केला

"अखंड सौभाग्यवती भव:"
त्याच पाठोपाठ श्रीरामाने सुद्धा चरणस्पर्श केला
"विजयी भव:"

सिता माता त्यांच्या रथात परतल्या. शेवटी पुजा उरकवुन दादाने पुजेची शेवटची सगळी विधी सुग्रीवाला सांगितली, आणि दादा सुद्धा पाठोपाठ निघाला. पण एक गोष्ट ईथे कोणालाच कळली नाही, श्रीरामाला परास्त करण्यासाठी निघालेल्या दादानं स्वतःच त्याला "विजयी भव:" असा आशिर्वाद दिला. शिवलिंगावर अर्पण केलेल बेलाच पान अजुनही तसच होत, त्यावरुन अलगद पाण्याचे तुषार खाली उतरत होते. महादेवाने दादाकडुन हे काय करवुन घेतल होत? महादेवाच्या मनात काय होत याचा थांगपत्ता मला काही केल्या लागत नव्हता, लागणारही नव्हता. अनिश्चितांनी भरलेल्या नेत्रांनी मी दादच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहीलो. वेळेच्या सहवासात ती एक ठीपक्याप्रमाणे केव्हा लय पावली माझ मलासुद्धा कळल नाही.

क्रमश:

उपसंहार
हो! मला माहीती आहे तुमच्या मनात काय प्रश्न उठलाय. रावण कधिच अश्या पुजेला आला नव्हता. राम आणि सिता कधिही युद्धापुर्वी असे भेटले नव्हते. कदाचीत काही वाचकांनी मधातच ही कथा वाचायची सोडलीसुद्धा असेल. पण मी तो धोका पत्कारायला तयार आहे.

मी रामायण बदलवुन लिहीण्याचा मी येथे प्रयत्न करत नाहीये. रामायणाचे पुष्कळ भाग प्रसारीत झालेले आहे आणि रामायणाचे वेगवगेळे उल्लेख त्यामधे करण्यात आले आहे. त्यामधलेच काही वेगवेगळे क्षण वाचकांच्या पदरी पाडण्याचा प्रयत्न मी करतो आहे. राम रावण भेटीचा हा उल्लेख "आध्यात्म रामायण" मधे आला आहे. जर तुमच्या संग्रहात हे रामायण असेल तर ते नक्की वाचाव अस मी तुम्हाला सुचवेल.
असो! या भागाच्या शिर्षकात "तीन भक्त" असा उल्लेख करण्यात आलेला आहे. यातले दोन भक्त तर तुम्हाला माहीतच आहे, राम आणि रावण. पण तिसरा भक्त हा विभीषण. तो एक खरा रामभक्त होता. त्याने रामासाठी आपल्या प्रिय दादालासुद्धा सोडले.

आता या युद्धाचा प्रारंभ होणार. अमृतकुंड चा पुढल्या भागामधे संपुर्ण युद्धचित्र रंगवण्याचा प्रयत्न मी प्रयत्न करणार आहे. आशा करतो पुढला भाग तुम्हाला नक्कीच आवडेल. या भागामधे काही त्रुटी आढळल्यास ब्लॉगवर तस नक्की कळवा.
२७ मार्च २०१७

Comments

Popular posts from this blog