अमृतकुंड - War Redefine भाग ३ - लक्ष्यभेद



प्रस्तावना

अमृतकुंड ही रामायणाच्या काही ठळक घटनांवर आधारलेली  कथांची एक मालिका आहे. हा या मालिकेचा तिसरा भाग
आहे. जर तुम्ही या मालिकेचे आधीचे भाग वाचले नसतील तर वाचकांना माझी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी आधीचे
भाग नक्की वाचावे आणि मगच पुढचे भाग वाचावे.


अमृतकुंडच्या या भागात कुंभकर्ण कोण होता आणि तो कसा वाधला गेला याची काही ठळक माहिती आणि युद्धचित्रे
रंगवण्याचा प्रयत्न करतोय आशा करतो तुम्हाला तो नक्कीच आवडेल.

***

युद्ध सुरू होऊन दोन प्रहर निघून गेले होते. वानर आणि राक्षसांमध्ये घनघोर युद्ध जुंपल होतं.  रक्ताच्या थारोळ्या आणि
धूळधाण उधळत राक्षस आणि वानर त्वेषाने लढत होते. राक्षसांकडे आकाशसेना, भुमीसेना आणि मायासेना असल्याने
त्यांना युद्धात बरीच मदत होत होती. आकाशसेनेचे राक्षस वानरांना आकाशात नेऊन कित्येक योजन खाली फेकून देत होते.
झाडांच्या मुळासारखी दिसणारी भुमीसेना जमिनीतुन कुठेही निघुन वानरांना जखडुन ठेऊत होती. पण राक्षसांकडे
वानरांसारखी चपळता, शिस्तबद्धता आणि संख्याबळ नव्हते. आणि वानरसेनेत बरेच मायावी योद्धे असल्यामुळे
राक्षसांची बाजु कुठेतरी कमकुवत भासत होती.

अचानक रणांगणात एक थरारक गगनभेदी शंखनाद उठला. शंखनाद ईतका त्रीव होता, संपूर्ण रणांगण हादरून ऊठले.
सगळ्या रणांगणाचे लक्ष लंकेच्या प्रवेशद्वाराकडे लागले. शंखनाद संपताच सगळी रक्षसेना आसुरी आनंदात युद्ध सोडून
लयबद्ध पध्दतीने हळूहळू मागे हटु लागली. थोड्या वेळात युद्धभुमीवर फक्त वानरसेनाच उरली. प्रवेशद्वार जेंव्हा पुर्णपणे
उघडले तेव्हा अजस्र कुंभकर्ण त्यामागे उभा होता. काही पावले चालत तो प्रवेशद्वारातून बाहेर आला. त्याच्या हातात
मद्याचा भला मोठा प्याला होता. हातातील मद्याचा प्याला रिता करत त्याने संपूर्ण द्रुष्टी वानरसेनेवर फिरवली.
कुंभकर्णाची माहाकाय शरीरयष्टी आणि त्याच्यातल शास्त्रतेज लपत नव्हते. त्यातुनच रावणाने त्याला आधीच
जागवल्याने तो खुपच क्रोधीत होता. अपुर्ण निद्रा, संपूर्ण भुक आणि भरपूर मद्यप्राशन केलेला कुंभकर्ण थोडा
असंतुलित आणि थोडा भानावर होता. युद्धाची जाणीव होताच कुंभकर्ण वानरसेनेवर तुटून पडला. भयभीत वानर
रणभूमीवर सैरावैरा पळु लागले. दोन्ही हातात जितके वानर येतील तितके तो पकडून तोंडात कोंबु लागला. त्याच्या
तोंडातुन रक्ताच्या थारोळ्या बाहेर पडु लागल्या. दगड, भाले आणि धनुष्यबाणांनी वानरसेना त्याच्यावर प्रहार करत
होती, पण कुंभकर्णावर या सगळ्यांचा क्वचितच फरक पडत होता.


***

कुंभकर्णाची आता बरीच भुक शमली होती. शमलेली भूक आणि उतरलेल्या मद्यामुळे कुंभकर्ण आता बराच भानावर
आला होता. संपूर्ण रणांगणात आपल्या गदा प्रहाराने कुंभकर्ण वानरसेनेला किडामुंगीसारखे चिरडू लागला. अवघ्या एक
प्रहरातच कुंभकर्णाने जवळपास एक त्तुतिआंश वानरसेना नष्ट केली. वानरसेनाचा संहार थांबवण्यासाठी हनुमान आणि
सुग्रीव पुढे सरसावले.

दूर सागराच्या किनाऱ्यावर राम-लक्ष्मण, जांबुवंत आणि विभीषण कुंभकर्णाचा पराक्रम पाहत होते.

"हा विशालकाय योद्धा कोण आहे विभीषण?" श्रीराम म्हणाले.

"प्रभू हा रावणाच्या सेनेतला सगळ्यात बलशाली योद्धा आहे,   कुंभकर्ण! एकदा का जर तो झोपला, तर तो पुन्हा सहा
महिन्यापर्यंत उठत नाही, आणि एकदा का तो जर उठला, तर भूक संपेपर्यंत  त्याच्यासमोर जे येईल ते तो खात सुटतो.
आणि माझ्या माहितीप्रमाणे हा कुंभकर्णाच्या निद्रेचा काळ आहे, मला वाटतं दादाने घाबरून त्याला आधीच जागवलय.
त्याच्यासमोर आपला कुठलाही योद्धा टिकाव धरू शकणार नाही प्रभू."

"मग तुझं यावर काय मत आहे विभिषणा, आपण कुंभकर्णाला कसं थांबवावं?"

"तुम्ही त्याची विशाल शरीरयष्टी तर बघतच आहात ना प्रभू,  त्याच्यावर कुठल्याही साधारण शास्त्राचा उपयोग
सहजासहजी होणार नाही आणि त्याला नमवने इतकी सोपेही नाही. कुंभकर्णाला असाच व्यक्ती वधु शकतो जो निद्राजीत
आहे आणि ज्याने आपल्या भुकेवर चौदा वर्ष नियंत्रण ठेवलेले आहे."

"हा तर नक्कीच चिंतेचा विषय आहे. लक्ष्मणा तुझ यावर काय मत आहे?"

"दादा, गुरुवर्यांच्या आज्ञेनुसार मी गेली चौदा वर्षे भूक आणि निद्रेवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झालेलो आहे आणि
कुंभकर्णाचा सामना करायला मी पूर्णपणे सज्ज आहे. पण दादा माझ अस मत आहे
की या युद्धात मी एकटा कुंभकर्णाला नमवू शकणार नाही. आता वेळ आली आहे की तुसुद्धा युद्धात उतरायला हवं"
 लक्ष्मण म्हणाला.

तिकडे कुंभाकर्णाने युद्धात हनुमंत आणि सुग्रीवला नमवलं आणि आता त्याची दृष्टी युद्धात श्रीरामाला शोधत होती.
सरतेशेवटी नीलवर्णीय श्रीराम त्याच्या दृष्टीस पडलेच. युद्धातून वाट काढत कुंभकर्ण श्रीरामापर्यंत पोहोचला आणि
आपला एक गुडघा जमिनीवर टेकवून सरळ श्रीरामाकडे बघु लागला. डोक्यावर शंकरासारखे जुडी बांधलेले श्रीराम एका
हातात खांद्याएवढा धनुष्यबाण घेऊन वर आकाशात कुंभाकर्णा कडे बघत होते.

"तर तू आहेस तो मानव, ज्याने एका जगजेत्याला आव्हान दिलय.  जी वानरसेना घेऊन तू आज माझ्यासमोर उभा
आहेस, त्याच वानरसेनेच्या वानर राजाला आज मी बंदी बनवून घेऊन चाललो आहे"

कुंभकर्ण आपला उजवा हात पुढे करत म्हणाला. त्याच्या हाताच्या मुठीत सुग्रीव निपचित पडलेला होता.

"उद्या याला घेऊन मी पुन्हा युद्धात उतरेल. जर तुझ्यात सामर्थ्य असेल तर माझा पराभव करून त्याला परत घेऊन
जा".

थोडावेळ शांततेत तसाच निघून गेला. लक्ष्मण, जांबुवंत, विभीषण आणि संपूर्ण वानरसेना श्रीराम आणि कुंभाकर्णाकडेच
बघत होती. अचानक कुंभकर्णाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि त्याचा कंठ गहिवरून आला. कदाचित त्या दोघांमध्ये
काहीतरी मुकसंवाद सुरु होता. थोड्या वेळातच कुंभकर्णाच्या चेहऱ्यावरची चर्या उजळून निघाली आणि त्याचे भाव पूर्ववत
झाले.

"कुंभाकर्णा..." निपचीत पडलेल्या सुग्रीवकडे बघत लक्ष्मण कुंभकर्णाला आव्हान देत म्हणाला.

"थांब लक्ष्मणा" श्रीराम लक्ष्मणाला मध्येच अडवत म्हणाले.

"पण दादा, सुग्रीव!"

"सुग्रीवची काळजी करू नकोस, त्याला काहीही होणार नाही" श्रीराम म्हणाले.

कुंभाकर्णाने एकच जळजळीत कटाक्ष लक्ष्मणावर टाकला आणि तेव्हाच युद्धसमाप्तीचा शंखनाद झाला. कुंभकर्णाने
आपली दृष्टी सूर्याकडे वळवली, सूर्य अस्ताला निघाला होता. पुन्हा रामाकडे आपली दृष्टी वळवत कुंभकर्ण म्हणाला.

"उद्या युद्धभूमीवर पुन्हा भेट होईल प्रभु"

"उद्याची आतुरतेने वाट राहील कुंभकर्णा" श्रीराम म्हणाले.

कुंभकर्ण तसाच सुग्रीवला घेऊन लंकेच्या प्रवेशद्वाराकडे निघून लागला. हवा मंदपणे वाहत होती, सूर्यास्ताला काहीच
क्षण उरले होते.
वानरसैनिक घायाळुंना आधार घेऊन परतत होते. राम-लक्ष्मण आणि विभीषन परत जात असलेल्या कुंभकर्णाच्या
पाठमोर्या शरीराकडे बघत होते.

***

युद्धाचा पुढला दिवस पुन्हा सुरु झाला. दुरून उठणारे अग्निचे लोट, गर्जना आणि युद्धामुळे माजलेला हाहाकार रावण
आपल्या महालातल्या उंच मनोऱया वरुन दोन्ही हात मागे बांधून न्याहाळत होता. खांद्यापर्यंत रुळणारे त्याचे केस
हवेमुळे भुरभुर उडत होते. युद्धाला जणु काही विरामच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कित्येक वर्षानंतर
असा बलाढ्य शत्रू आज रावणाच्या दारी ठाण मांडुन बसला होता.

अचानक धरतीमधे मंद मंद भुकंपाचे तरंग उठले, धरती  हादरून उठली. धम् धम् असा आवाज हळूहळू मोठा होत गेला
आणि अचानक थांबला. रावण अजुनही युद्धभुमीकडेच पाहात होता.

"प्रणाम दादा" कुंभकर्ण हात जोडुन म्हणाला.

रावण मागे वळला. धिप्पाड देहाचा अजस्र कुंभकर्ण अधोवदनात हात जोडून उभा होता. कुंभकर्णाचा चेहरा उंच
मनोऱयापर्यंत पोहोचला होता. रावणाने प्रथमच कुंभकर्णाला ईतक्या दुखाःत पाहिले होते.

"कुंभ आणि निकुंभाचा समाचार ऐकुन खुप दुखः झाले. त्यांनी युद्धात पराक्रमाची शर्थ केली. त्यांच्या तोडीचे कुशल
राक्षस योद्धे लंकेला परत कधीही मिळणार नाही. सुग्रीवला बंदी बनवून तु योग्य तेच केल कुंभकर्णा. युद्धात धारायशी
पडलेल्या कुंभ-निकुंभाला उचीत तोच सन्मान मिळाला."

कुंभकर्ण शांतचित्ताने अधोवदनात हात जोडुन तसाच ऊभा होता. रावण पुढे बोलु लगला.

"या खोळंबलेल्या युद्धाला आता आपल्याला मार्गी लावण अत्यंत आवश्यक झाल आहे कुंभकर्णा. त्या मानव आणि
त्याच्या वानरांनी उच्छाद मांडुन ठेवला आहे. हे युद्ध आता..."

"हे युद्ध नाही दादा, हा मुर्खपणा आहे" रावण पुढे काही बोलायच्या आतच कुंभकर्ण पुढे बोलला. रावणाची आणि
कुंभकर्णाची एकच नजर भेट झाली. थोडावेळ शांततेत तसाच केला. डोक्यावर आठ्या आणत शांततेचा भंग करत
रावण पुढे म्हणाला

"तुला काय म्हणायचं आहे तर स्पष्टपणे बोल कुंभाकर्णा" रावणाचे डोळे आग ओकत होते.

"हो दादा, हे युद्ध नाही हा मूर्खपणा आहे. लंकाधिपती एका स्त्रीला पळवून आणतात काय आणि एक मानव वानरांच्या
मदतीने लंकेवर युद्ध पुकारतो काय. आज लंकेची जी स्थिती आहे ती देव-दानवांच्या युद्धातसुद्धा कधी झाली नव्हती.
लंकाधिपतींना काय सुंदर स्त्रियांची कमी आहे जे त्यांनी एका विवाहित स्त्रीला पळवून आणावं. आपण जर आदेश दिला
तर हजारो सुंदर कंन्या आपल्या सेवेसाठी तत्काळ हजर होतील, मग या एकाच स्त्रीसाठी युद्धाचा वेडेपणा कशाला,
हा संहार कशाला?"

रावण काहीही न बोलता युद्धभूमीकडे वळला. उंच मनोरावरून दिसणारा युद्धाचा दृश्य अजूनही तसच दिसत होत.
शांततेचा भंग करत कुंभकर्ण पुढे बोलू लागला.

"आज युद्धात कुंभ आणि निकुंभ धारातीर्थी पडले, उद्या इंद्रजीत सुद्धा युद्धात जाईल.  हे युद्ध तू कुठपर्यंत लढणार आहेस
दादा, रक्ष साम्राज्याच्या अंतापर्यंत? ज्या स्त्रीला तू पळवून घेऊन आला आहेस तिला तु हातसुद्धा लावू शकत नाहीस
आणि त्यावरूनही तू या युद्धावर अडून बसला आहेस. हे युद्ध इथेच थांबव दादा, या युद्धाने काहीही साध्य होणार नाही"

युद्धभूमीकडे पाहत असलेला रावण पुढे बोलू लागला.

"हे युद्ध थांबवायची काहीच गरज नाही कुंभकर्णा. जर तू सुग्रीवला बंदी बनवून परत आला नसतास, तर हे युद्ध कालच
संपलं असतं. आणि आज हे युद्ध संपवूनच तु परत येशील असा मला विश्वास आहे"

"दादा मला युद्धाची भीती नाही, पण एक सामान्य मानव आपल्या सारख्या जगजेत्यासमोर इतका वेळ टिकाव धरणे ही
काही साधारण गोष्ट नाही, याचा विचार तरी तू केला आहेस का?"

"विसरू नकोस कुंभाकर्णा मी अजेय आहे, मला कुणीही वधू शकत नाही.  परमपिता ब्रह्माकडून मी तसा मनोवांच्छीत
वर आधीच मागून घेतलेला आहे"  रावण युद्धभुमीकडे बघत म्हणाला.

"कुठल्या वराची गोष्ट करतोयस दादा?  तू मागितलेल्या त्या वरामध्ये तू मानवाचा उल्लेख केला नव्हतास हे तु विसरू
नकोस. आणि आपल्यासमोर उभा ठाकलेला शत्रू एक मानव आहे त्यामुळे तो तुला वधू शकतो. आपल्यासमोर उभा
असलेला शत्रू कोणी साधारण मानव नाही हे अगदी स्पष्टच आहे. मी राम-लक्ष्मणाला अगदी जवळून बघितल आहे दादा.
ते दैवीय गुणांनी संपन्न असे तेजस्वी मानव आहे. त्यांच्यातलं शास्त्र तेज अद्वितीय आहे. त्यांच्यासारखे नरवीर संपूर्ण
विश्वात मी आजपर्यंत कुठेही पाहिले नाही. कित्येक तपः ज्या विष्णूला तू आजपर्यंत शोधत होतास तो आज तुझ्या दारी
मानवरूप घेऊन प्रगट झालेला नाही हे तु कसे सिद्ध करशील? हे युद्ध नाही दादा हा अंत आहे, अंत" कुंभकर्ण निराश होऊन
म्हणाला.

"मला तुझे हे भेकडपणाचे शब्द ऐकायचे नाही! आणि विसरू नकोस, तू जगज्जेत्या रावणाचा भाऊ आहेस"  रावण गरजला.

"आणि जर तुला युद्धात परतायचे नसेल तर तसे स्पष्टपणे सांग, हे युद्ध जिंकायला हा रावण समर्थ आहे"

"दादा मी कमकुवत नाही किंवा भेकडही नाही. पण सत्य आपल्याला  स्वीकारायलाच पाहीजे" कुंभकर्ण अत्यंत शोकाने
म्हणाला.

काही क्षण आपल्याशीच मनात द्वंद करून रावण निश्चयाने पुढे म्हणाला.

"एका योद्धाला लढणे हे कर्मप्राप्त असते आणि तीच त्याची नियती असते. या युद्धातून आपण माघार घेऊ शकत नाही
कुंभकर्णा. या युद्धाचा अंत काहीही असो, या युद्धात लढणे हीच तुझीसुद्धा नियती आहे आणि याला तू नकारू शकत नाही.
आणि राहिला प्रश्न मला वधायचा, आपल्यासमोर उभा असलेला शत्रू हा मानव आहे आणि हे सत्य आहे की मला
मानवापासून अभय नाही. पण कुंभाकर्णा प्रत्येकाच्या जीवनात स्वतःची अशी काही रहस्य असतात जी त्यांना सदैव
यशाच्या शिखरावर ठेवतात, अशीच काही रहस्य माझी सुद्धा आहेत. म्हणूनच मी अजेय आहे, अमर आहे आणि मला
कोणीही वधू शकत नाही. युद्धाची सिद्धता कर आणि युद्ध जिंकुनच परत ये. तू आता जाऊ शकतोस, माझा आशीर्वाद
सदैव तुझ्या सोबत आहे"  रावणाने चर्चा तिथे समाप्त केली.

कुंभाकर्ण थोडावेळ रावणाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तसाच बघत राहिला. रावन अजूनही दोन्ही हात मागे बांधून
युद्धभूमीकडे बघत होता. रावणाच्या खांद्यावर बांधलेले भूशिर वाऱ्यावर फडफडत होते.  शांततेचा भंग करत कुंभकर्ण
पुढे म्हणाला

"मी आशा करतो दादा, तुला माहित आहे की तू काय करतोय.  प्रणाम"

भूमीवर भूकंपाचे तरंग उठवत कुंभकर्ण निघून गेला. रावण अजुनही युद्ध भूमीकडे तसाच बघत होता.

***
दिवस संपायला फक्त दोनच प्रहर उरले होते आणि अजूनही कुंभकर्ण युद्धात उतरला नव्हता. कुंभकर्णाची वाट बघता
बघता लक्ष्मणाचा संयम शिगेला पोहोचला होता. शेवटी न राहवून तो श्रीरामाला म्हणाला

"दादा, जर तु मला कालच कुंभकर्णाला थोपवू दिले असते तर सुग्रीव आज आपल्या सोबत असता. दिवस संपायला काही
प्रहरच उरलेत दादा, आपण सुग्रीवला कस परत आणणार. शेवटी काहीही झालं तरी राक्षस ही घोर पातकीच, त्यांच्यावर
विश्वास ठेवून आपल्याला हे युद्ध जिंकता येणार नाही"

लक्ष्मण हे सगळ बोलून तर गेला, पण आपल्या बाजूला विभीषनही उभा आहे याचंही त्याला भान राहिलं नाही. पण
विभीषनही लक्ष्मणाकडे बघून मंद मंद स्मित करत होता, कारण त्याला लक्ष्मणाचा क्रोध आणि उतावीळपणा परिचित
होता.

श्रीराम अजूनही लंकेच्या प्रवेशद्वाराकडेच बघत होते.
"कुंभाकर्णासाठी आजच युद्ध निर्णायक आहे लक्ष्मणा, तो नक्कीच येईल"

तेवढ्यातच लंकेच्या प्रवेशद्वारामागन कानठळ्या बसवणारा शंखनाद झाला.  प्रवेशद्वार जेंव्हा संपूर्णपणे उघडलं तेव्हा
त्यामागे अजस्त्र गदाधारी कुंभकर्ण सज्ज उभा होता.

"हनुमंता, संपूर्ण वानरसेनेला मागे फिरायला सांग. मी आणि लक्ष्मण वगळता प्रत्यक्ष युद्धात कोणीही भाग घेणार नाही
याची दक्षता घे"
श्रीरामाने हनुमानाला आदेश दिला.

"जशी आपली आज्ञा प्रभू"  हनुमान नम्रपणे हात जोडत म्हणाला आणि उंच उडी मारुन निघून गेला.

गदाधारी कुंभकर्ण युद्धभुमीकडे येऊ लागला.

"तु सज्ज आहेस लक्ष्मणा?"  

लक्ष्मणाने मान हलवुन होकार दिला.  

कुंभकर्ण जेंव्हा रणांगणात मध्यवर्ती पोहोचला तेंव्हा राम लक्ष्मण त्याच्या समोर येऊन उभे राहीले. कुंभकर्णाने आपल्या
भल्या मोठ्या काटेरी गदेच धुड जमिनीवर टेकवल आणि खाली रामाकडे बघु लागला. एका विशालकाय हत्तीसमोर दोग
सिंहाची नवजात अभ्रक उभी आहे अस चित्र दिसु लागल. संपूर्ण वानर आणि राक्षस सेना गोलाकार उभी होती. युद्धभुमीवर
प्रत्येकाचेच भाव टिपण्यासारखे होते. कुणाच्या चेहऱ्यावर भीती होती, कुणाच्या चेहऱ्यावर क्रोध होता तर कुणाच्या
चेहऱ्यावर हे कुतूहल होते की या युद्धाचा शेवट काय असणार.

लक्ष्मणाचे डोळे अजुनही सुग्रीवालाच शोधत होते. सुग्रीव न दिसताच लक्ष्मण गुरकावला.

"कुंभकर्णा... सुग्रीव?"

कुंभकर्णाने लक्ष्मणाकडे एकच कटाक्ष टाकला आणि आपला हाताने इशारा केला. कुंभकर्णाच्या पाठीमागनं दोन पक्षांसारखे
राक्षस पंख फडफडत बाहेर आले. दोन्ही राक्षसांनी सुग्रीवाचा एक एक हात धरून ठेवला होता. सुग्रीवाची मान खाली होती
आणि अजुनही तो शुद्धीवर नव्हता.

वानरसेनेतुन एक वक्ती बाहेर येऊ लागली. कुंभकर्णाची द्रुष्टी त्याच्याकडे वळली, तो विभीषण होता. लक्ष्मणाच्या मागे
थांबून हात जोडुन तो म्हणाला.

"प्रणाम दादा"

"आयुष्यमान भव:" हात वरती करत आशीर्वाद देत कुंभकर्ण म्हणाला.  

दोन भावांची नजरभेट झाली. दोघांच्याही डोळ्यात अपार क्रुतज्ञता होती आणि बरेच मुकसंवाद होते. पण भाव आणि
शब्दांना आता रणांगणात कुठेही जागा नव्हती. विभीषण आला तसाच निघून गेला. कुंभकर्ण युद्धासाठी असा काही सज्ज
होता, जणु काही त्यांला युद्धाचा अंतिम परिणाम माहित होता.

श्रीरामाने आपले दोन्ही हात वरती खांद्यापर्यंत उंचावले आणि दोन्ही डोळे बंद करून मंत्र म्हणायला सुरुवात केली. मंत्र
संपताच तळहातावर एक प्रकाशित खडग प्रगट झालं.  प्रगट झालेल खडग आदरपूर्वक श्रीरामाने मस्तकी लावलं. उजवा
हात अलगद खडगाच्या मुठीवर आवळला आणि डाव्या तळहातावर त्याची धार न्याहाळत अत्यंत कौशल्यपुर्वक हवेत ते
खडग फिरवल. लक्ष्मणानेसुद्धा आपल्या धनुष्यावर ची मूठ आवळली आणि युद्धासाठी सज्ज झाला.  कुंभकर्णाने आपली
काटेरी गदा गोल फिरवली आणि क्रोधाने आपला विशाल जबडा ताणून तो चित्कारला. त्याच्या चित्काराने संपूर्ण
रणांगण हादरून उठले.

राम आणि लक्ष्मण दोघेही आपले शस्त्र घेऊन कुंभकर्णाच्या दिशेने धावू लागले आणि युद्ध सुरू झाले. कुंभाकर्णाने चित्कार
करून आपली काटेरी गदा राम-लक्ष्मणाच्या दिशेने जमिनीवरून भिरकावली. गदेचा प्रहार होत आहे हे दिसताच  दोन्ही
बंधूंनी जमिनीवरून गोल गिरकी घेतली. गदेचा प्रहार त्यांनी घेतलेल्या गोल गिरकीमुळे त्यांच्या शरीराच्या काही
अंतरावरून निघून गेला. लगेचच दोघांनी स्वतःला सांभाळत एकमेकांकडे पाहिले, रामाने लक्ष्मणाला मानेनेच इशारा
केला. इशारा मिळताच लक्ष्मणाने चपळाईने वीरासनात बसून एक बाण कुंभाकर्णाच्या हाताच्या दिशेने सोडला.
 कुंभाकर्णाचे दोन्ही हात अजूनही गदेसोबत गतीमधेच होते. लक्ष्मणाचा बाण कुंभकर्णाच्या मूठ आवढलेल्या उजव्या
हातात रुतून बसला. झालेल्या आघातामुळे कुंभाकर्णाच्या हातची गदा सुटली आणि दूर फेकल्या गेली. श्रीराम
कुंभाकर्णाच्या दिशेने भरधाव धावत सुटले.

श्रीरामांच्या गती सोबतच त्यांच्या हातचे खडक तीव्रतेने प्रकाशमान व्हायला लागले. प्रकाशाची तीव्रता इतकी वाढली
होती की कुंभाकर्णाला प्रकाशाशिवाय काहीच दिसल नाही आणि त्यांने आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर धरले.
तेवढ्यातच रामाने उंच उडी घेऊन  कुंभाकर्णाच्या टोंगळ्यावर जोरदार प्रहार केला. प्रहार इतका तीव्र होता की कुंभाकर्णाचा
फक्त अर्धाच पाय कापला गेला. क्षणार्धात काय झाले हे कुंभकर्णाला काहीच कळले नाही, कुंभाकर्णाने आपल्या दोन्ही
हातांनी घायाळ टोंगळा धरला आणि त्याचा तोल जाऊन तो जमिनीवर पडला. कुंभाकर्ण पडताच लक्ष्मण  मंत्रौत्तच्चार
करत त्याच्याकडे धावू लागला आणि धावता धावता त्याने आपल्या भात्यातून बाण बाहेर काढला. कुंभाकर्ण स्वतःचा
तोल सांभाळत जमिनीवर बसायचा प्रयत्न करू लागला, आणि तेवढ्यातच लक्ष्मण कुंभकर्णाच्या जवळ येऊन पोहोचला.
लक्ष्मणाने वेगातच उंच तीन उड्या घेऊन कुंभकर्णाच्या जखमी टोंगळ्यापर्यंत पोहोचला आणि शेवटची एक उंच उडी
घेतली. हवेतच लक्ष्मणाने धनुष्याला प्रकाशित बाण जोडला आणि कुंभाकर्णाच्या छातीच्या मधोमध सोडला. मंत्रोच्चारीत
बाण छातीत घुसताच कुंभाकर्ण अत्यंत वेदनेने किंचाळला आणि जमिनीवर पडून गतप्राण झाला.

संपूर्ण वानर आणि राक्षस सेना अवाक् होऊन दोन्ही बंधूंकडे बघत होती. कारण अवघ्या काही क्षणातच कुंभकर्ण वधला
गेला होता.
ज्या दोन राक्षसांनी सुग्रीवला हवेत धरून ठेवले होते, त्यांनी त्याला हवेतुनच खाली सोडुन दिले. निपचीत सुग्रीवला
कोसळतांना पाहून हनुमानाने उंच उडी घेतली आणि त्याला हवेतच धरून जमिनीवर उतरला.

लक्ष्मण जवळ आला तेव्हा श्रीराम निपचित पडलेल्या कुंभाकर्णाकडे बघत होते. जेव्हा दोघेही मागे वानरसेनेकडे वळले
तेव्हा वानर सेनेतला प्रत्येक सैनिक हात जोडून एका गुडघ्यावर बसून वंदन करू लागला. काही क्षण तसेच निघून गेले.
हनुमानाने  आपल्या हाताची मूठ हवेत फिरवत जयघोष केला.
"जय श्रीराम"

त्याच्या पाठोपाठच संपूर्ण वानर सेनेत प्रचंड जयघोष उठला.
"जय श्रीराम, जय श्रीराम..."

श्रीराम पुन्हा मागे वळले आणि त्यांची दृष्टी लंकेच्या उंच मनोऱ्यावर स्थिरावली. त्या उंच मनोऱ्यावर काळ्या
ठिपक्याएवढी एक आकृती दिसत होती. रावण दोन्ही हात मागे बांधून युद्धभूमीकडे पडलेल्या कुंभाकर्णाकडे बघत
होता. रावणाने आज त्याचा सर्वात प्रिय बंधू गमवला होता. त्याच्या डोळ्यांच्या कडांवर प्रकाश चमकून उठला आणि
दोन्ही डोळ्यातून अश्रू बाहेर पडू लागले. सूर्य अस्ताला निघाला होता. युद्धभूमीवरून शंखनाद उठले आणि युद्धसमाप्तीची
घोषणा झाली. शंखनादामुळे रावण भानावर आला, त्याच्या सूर्योपासनेची वेळ जवळ आली होती. रावणाने एकच दीर्घ
निश्वास सोडला, दोन्ही हात त्याने अलगद कमरेपर्यंत मागे नेले. किंचित वाकून त्याने मनोऱ्यावरून आकाशात एक
उंच झेप घेतली. आकाशातून खाली येताना त्याने आपले संपूर्ण शरीर हवेत झोकून दिले. भूमीचा भाग दिसताच अलगद
गिरकी घेत त्याने दोन्ही पाय आणि हात जमिनीवर ठेवले. जमिनीवर धाडकन उतरताच बाजूच्या तळ्यात पाण्याचे तरंग
उठले.  तळ्याच्या बाजूलाच काही राक्षस सैनिक सज्ज होते आणि राक्षसी दासी पूजेचे साहित्य घेऊन उभ्या होत्या.

"कुंभकर्णाच्या शवाला लंकेत आणण्याचा प्रबंध करा"  रावण सैनिकांना आज्ञा देत म्हणाला.

रावणाने खांद्यावरचे भुशीर उतरवले. आरतीमधला पाण्याचा कमंडलू घेऊन रावण तळ्यात उतरला आणि सूर्याला
अर्ध्य प्रदान करू लागला.

क्रमशः

***

उपसंहार

अमृतकुंड War Redefine भाग ३ ची माझी कल्पना आधी काही वेगळीच होती. पण बरेच दिवस लेखनाला विराम
लागल्यामुळे मी ही कल्पना थोडी बदलण्याचा निश्चिय केला. अमृतकुंडाचे आधीचे भाग जेव्हा मी वाचून काढले तेव्हा
मला असे वाटले कि अमृतकुंडचा पुढचा भाग आपण कुंभाकर्णाला समर्पित करावा आणि तो कसा वधला गेला याचे
काही युद्धचित्रे रंगवावे. पण कथानकांमध्ये कुंभकर्णाबद्दल जास्त माहिती नसल्यामुळे मला इंटरनेटवर त्याची माहिती
मिळवावी लागली आणि मला त्याची बरीच मदत मिळाली. आशा करतो अमृतकुंडचा हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला
असेल.

आता अमृतकुंडचा शेवटच्या भागाची वाट मला खुपच आतुरतेने राहील, कारण हा भाग माझ्या मनाच्या खूपच
जवळ आहे. आणि कदाचित मी या भागासाठीच अमृतकुंडची रचना केली होती असे मला वाटते. हा शेवटचा भाग
पूर्णपणे राम-रावण युद्धालाच समर्पित राहील. या भागाची सगळीच युद्धचित्रे एका चलचित्राप्रमाणे माझ्या मनात दडून
आहे, पण त्यांना शब्दांमध्ये बांधणं थोडं कठीणच आहे. तरीही मी नक्कीच या शेवटच्या भागाला योग्य तो न्याय
द्यायचा प्रयत्न करीन. हा भाग अमृतकुंडच्या इतर भागांपेक्षा थोडा जास्त मोठा आणि रोमांचकही असेल.  

तोपर्यंत वाचकांना ही माझी विनंती आहे की आपण अमृतकुंडाचे सगळेच भाग एकदा नक्की वाचून काढावे आणि
मला आपल्या अमूल्य प्रतिक्रिया आणि विचार कळवावे, जेणेकरून मी या शेवटच्या भागात माझ्या मनातील विचार
अधिकाअधिक चांगल्या पद्धतीने आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू शकेल.  या भागात जर काही त्रुटी राहिल्या
असतील तर त्याबद्दल मी दिलगीर आहो. आपल्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट राहील.

जय श्रीराम
२० जानेवारी २०१९


Comments

Popular posts from this blog